प्रकरण ३ : मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन : भौगोलिक कारणे लिहा

 भौगोलिक कारणे लिहा : (प्रत्येकी  गुण)

maharashtra state board geography bhugol important questions and answers marathi medium 

प्रकरण ३ : मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन

 

(१) भू-रचनेचा वसाहतींवर परिणाम होतो.

/ महत्त्वाचे मुद्दे : (१) भू-रचनेचा वसाहतींच्या स्थानावरील परिणाम- किनारी मैदान, नदी मैदान, पर्वत पायथा, पर्वत माथा (२) भू-रचनेचा वसाहतींच्या दृश्य स्वरूपावरील परिणाम - विखुरलेल्या किंवा केंद्रित.

उत्तर : भू-रचनेच्या स्वरूपानुसार वसाहतीचे स्थान व स्वरूप बदलते. सागरकिनारी मैदानी प्रदेशात वसाहती निर्माण होतात आणि या बहुतांशी वसाहती सागरी किनाऱ्यास समांतर असतात. नदीच्या मैदानी प्रदेशात सपाट प्रदेशामुळे उत्तम वाहतूक सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे वसाहती विस्तृत स्वरूपात आढळतात. पर्वतांच्या पायथ्याशी, पर्वत पठारावर व पर्वत माथ्यावर वस्त्या विकसित होतात.

 

(२) काही वेळेस वर्तुळाकार वस्ती निर्माण होते.

/ महत्त्वाचे मुद्दे : (१) अत्यंत प्रभावी केंद्राच्या भोवती वसाहतीचे स्थान व वाढ (२) इतर कोणत्याही घटकापेक्षा 'पाणी' हा अत्यंत प्रभावी घटक (३) म्हणून विहीर, तलाव, सरोवर किंवा मरूदयानाभोवती विकसित होणाऱ्या वर्तुळाकार वस्त्या.

उत्तर : पाण्याची उपलब्धता हा घटक वस्तीच्या स्थानावर विशेष प्रभाव पाडतो. ग्रामीण वस्त्या बहुतांशी नदीच्या किनारी रेषीय स्वरूपात विकसित होतात. मात्र, ज्या प्रदेशात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नसते, अशा ठिकाणी विहिरी तसेच तलावाच्या किंवा सरोवराच्या जवळ वर्तुळाकार स्वरूपात वस्ती वाढते.

 

(३) सर्वच ग्रामीण वस्त्यांचे रूपांतर नागरी वस्त्यांत होतेच असे नाही.

/ महत्त्वाचे मुद्दे : (१) वस्तीच्या वाढीवरील प्राकृतिक घटकांची प्रतिकूलता (२) प्राथमिकेतर व्यवसायांच्या वाढीस मर्यादा (३) मर्यादित लोकसंख्या वाढ (४) साधनसंपत्तीची कमतरता.

उत्तर : ग्रामीण वस्तीचे स्थान हे प्रामुख्याने प्राकृतिक घटकांवर अवलंबून असते. जेव्हा ग्रामीण वस्ती विकसित होते, तेव्हा भौगोलिक अनुकूलता या घटकास प्राधान्य दिल्यामुळे पर्वत पायथा, कृषिजमीन, पाण्याची उपलब्धता हे घटक जास्त प्रमाणात विचारात घेतले जातात. साहजिकच तेथे कृषी व कृषिसंबंधित आर्थिक व्यवसाय चालताना दिसतात. थोडक्यात, ग्रामीण भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडित असतो. अशा वस्तीत इतर व्यवसायांचा विकास फारच संथ गतीने होतो. उदयोग- आधारित द्वितीयक व्यवसाय आणि सेवा आधारित तृतीयक व्यवसाय या व्यवसायांची वाढ व्यवस्थित होत नाही. अशा वस्तीची लोकसंख्या वाढ ही मर्यादित असते. अशा वस्तीच्या वाढीवरही मर्यादा असतात. कारण स्थानिक साधनसंपत्तीची कमतरता असते. अशा वेळेस त्या ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीत होईलच असे नसते.

 

(४) ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असते.

(सप्टें. '२१)

 

/ महत्त्वाचे मुद्दे : (१) प्राकृतिक घटकांचा जास्त प्रभाव (२) पाणी, भू-उतार, मृदा या घटकांचा वस्तीच्या स्थाननिश्चितीवरील प्रभाव (३) इतर व्यवसायांच्या वाढीस मर्यादा.

उत्तर : ग्रामीण वसाहतीचे स्थान हे प्रामुख्याने प्राकृतिक घटकांवर अवलंबून असते. जेव्हा ग्रामीण वस्ती विकसित होते, तेव्हा भौगोलिक अनुकूलता या घटकास प्राधान्य दिल्यामुळे पर्वत पायथा, कृषिजमीन, पाण्याची उपलब्धता हे घटक जास्त प्रमाणात विचारात घेतले जातात. साहजिकच तेथे कृषी व कृषिसंबंधित आर्थिक व्यवसाय चालताना दिसतात. थोडक्यात, ग्रामीण भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडित असतो.

 

(५) लोकसंख्या वितरण आणि नागरीकरण यांचा परस्पर सहसंबंध आहे.

/ महत्त्वाचे मुद्दे : (१) विविध नागरी वस्त्यांमधील शहरांचे महत्त्व (२) शहरांच्या आकर्षणाची कारणे (३) शहरांतील वाहतूक, पाणीपुरवठा, शिक्षण, वैदयकीय सोयी या सुविधांची उपलब्धता (४) रोजगाराच्या संधी (५) स्थलांतर (६) या सर्वांचा लोकसंख्या वितरणावरील प्रभाव.

उत्तर : शहरात येऊन कायमचे वास्तव्य करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे, शहरांची संख्यादेखील वाढत आहे. शहरात नोकरी व कामधंदा मिळण्याची सुलभता, कामाच्या जागी आवश्यक सुविधा राहण्यासाठी चांगली घरे तसेच व्यापार, वाहतूक, शिक्षण, करमणूक यांच्या आवश्यक सोयी यांमुळे ग्रामीण भागांतील लोकांचा ओघ शहरांकडे येत राहतो. या कारणांमुळे लंडन, टोकियो, सोम पाऊल, बीजींग, मुंबई, कोलकाता यांसारख्या शहरांत लोकवस्ती अत्यंत दाट झालेली आढळते. याचाच अर्थ लोकसंख्या वितरण व नागरीकरण यांचा परस्पर सहसंबंध आहे.

 

(६) झालर क्षेत्रांमध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात.

/ महत्त्वाचे मुद्दे : (१) ग्रामीण - नागरी सीमावर्ती क्षेत्र (२) लोकवस्तीत वाढ (३) मात्र, ग्रामीण प्रभाव कायम (४) भूमी आच्छादन व भूमी उपयोजनात संमिश्र प्रभाव.

उत्तर : शहरांचे क्षेत्र जिथे संपते तिथून मोकळी जागा किंवा ग्रामीण क्षेत्राची सीमा सुरू होते. अशा ग्रामीण आणि शहरी क्षेत्राच्या मधील भागाला झालर क्षेत्र म्हणतात. झालर क्षेत्र हे एक प्रकारे दोन्ही वस्त्यांचे संक्रमण क्षेत्र असते. बहुतांशी वेळेस झालर क्षेत्रामध्ये नागरी वस्तीचा प्रसार किंवा विस्तार होत जातो. त्यामुळे एकीकडे या झालर क्षेत्रात ग्रामीण भूमी उपयोजनाचा प्रभाव दिसतो. तेथे वनक्षेत्र, कृषिक्षेत्र, जलसाठे असे भूमी आच्छादन आढळते. मात्र, त्याच वेळेस हळूहळू नागरीकरणाच्या प्रभावामुळे निवासी बांधकाम, उद्योग, खाणकाम असे नागरी भूमी उपयोजनही दिसू लागते. म्हणूनच झालर क्षेत्रांमध्ये ग्रामीण आणि नागरी अशा दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात.

 

(७) नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडित आहे. (मार्च २२)

/ महत्त्वाचे मुद्दे : (१) नगराची वाढ (२) जमिनीची वाढती मागणी (३) बांधकाम क्षेत्र व इतर सेवा-सुविधा, वाहतूक यांत वाढ व बदल (४) नगरांच्या ठेवणीत, आकृतिबंधात व भूमी उपयोजनात बदल.

उत्तर : जसजशी नगरांची वाढ होत जाते, तसतशी तेथील जमिनीची निकडही वाढत जाते आणि भूमी उपयोजन बदलतही जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे निवासाची

मागणी वाढते, त्यामुळे बांधकाम क्षेत्रात वाढ होते. त्याचबरोबर वाहतूक सेवा सुविधा, शैक्षणिक सेवा-सुविधा, वैदयकीय सेवा-सुविधा अशा बहुविध सेवा-सुविधांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे नगरांची एकूणच ठेवण, आकृतिबंध आणि भूमी उपयोजन बदलत जाते.

 

(८) राजस्थानमध्ये बहुतांशी वस्त्या केंद्रित स्वरूपाच्या आहेत.

/ महत्त्वाचे मुद्दे : (१) वाळवंटी प्रदेश (२) जलसाठे कमी (३) पर्जन्याचे प्रमाण व वनक्षेत्र कमी (४) पाण्याच्या उपलब्धतेनुसार वस्तीचे, घरांचे केंद्रीकरण.

उत्तर : राजस्थान हा वाळवंटी प्रदेश आहे. या प्रदेशात उष्णतामान जास्त असून, पावसाचे प्रमाण कमी आहे. या प्रदेशात वने कमी असून, हवामान अत्यंत विषम आणि प्रतिकूल असते. या प्रदेशात जलसाठे किंवा पाण्याचे दुर्भिक्ष आहे. म्हणून ज्या भागात विहिरी, तलाव, सरोवरे व नदी आहेत, तेथे पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरांचे केंद्रीकरण होऊन केंद्रित स्वरूपाच्या वस्त्या निर्माण होतात. म्हणून राजस्थानमध्ये बहुतांशी वस्त्या केंद्रित स्वरूपाच्या आहेत.